| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुर्नबांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीचा 8 व्या मजल्याचा स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यातील 2 कामगार गंभीर जखमी असल्याचे समजते.
शहरातील कैलास पार्क सोसायटीचे पुर्नबांधणीचे काम सुरू असून, या इमारतीचे आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम 10 कामगार करीत होते. काम सुरू असताना अचानकपणे बुधवारी (दि. ०९) रात्री 8.45 च्या सुमारास तो स्लॅब खाली कोसळला. यावेळी बांधलेल्या संरक्षक जाळीमुळे तिसर्या मजल्यावर हा स्लॅब कोसळून त्यामध्ये 7 कामगारांना हात-पाय व डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्यातील 2 कामगार हे गंभीर जखमी असून, त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.अभंग व पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पनवेल अग्नीशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते.