| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड गावच्या हद्दीतील कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि.08) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोलाड आणि रोहा दरम्यान असलेल्या अप रेल्वे लाईनवरील इलेक्ट्रिक पोल नं.10/27 च्या जवळ, पुगांव येथील रहिवाशी पंढरीनाथ बबनराव देशमुख (58) यांना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव-लोकमान्य टिळक एक्सप्रेस रेल्वेने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून त्यांना तातडीने रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोसई पोलिस कर्मचाऱ्यांनी, एन. एन. चौधरी आणि एन. झेड सुखदेवे यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू केला आहे.