उरण | वार्ताहर |
उरण पूर्व विभागात नव्याने येऊ घातलेला सिडकोचा(नैना) ह्या वादग्रस्त प्रकल्पाला सर्व ग्रामपंचायतींनी या अगोदर कडवा विरोध केला आहे. आणि आता हा विरोध आणखीन तीव्र होत चाललेला आहे. या विरोधात उरण पूर्व गावामधून वैयक्तिक हरकती दाखल झाल्या आहेत.
नैना प्रकल्प स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करील व आपल्या पिकत्या जमिनी घशात घालतील. आपल्या स्वतःच्याच मालकीच्या हक्काच्या जागेवर गावठाणाबाहेर 7/12 वर असलेली घरे बेकायदेशीर ठरतील अशी भीती सर्वाना वाटू लागली आहे. येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात काल सोमवार दि.03 जानेवारीला खोपटे,कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, गोवठणे, चिरनेर आदी गावामधून हजारो वैयक्तिक हरकती घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत उपसभापती शुभांगी पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध राजकीय पक्षीय स्थानिक पदाधिकारी व नेते, तसेच उरण विभागातील सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ यांनी प्राथमिक स्वरुपात बेलापूर येथिल सिडको कार्यालयात जाऊन सिडको अधिकारी मुख्य नियोजनकार अधिकारी सिडको( नैना) रविंद्र कुमार मानकर व वरिष्ठ नियोजनकार प्रांजली केणे मॅडम यांच्याकडे घेतलेल्या हरकती सुपूर्द केल्या.
यावेळी आम्ही घेतलेल्या हरकती विचारात घ्याव्यात अशी मागणी करून जर या प्रकल्पामुळे स्थानिक भूमीपुत्र उध्वस्त होत असेल तर ह्या प्रकल्पाला आणखीन तीव्र होईल. त्यानंतर होणार्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा उपस्थितांनी अधिकारी वर्गाला दिला आहे.







