माणगाव कृषी कार्यालयातील रिक्त पदे भरा

। माणगाव । प्रतिनिधी ।
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शासनाने माणगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा माणगाव तालुकाध्यक्ष संजय ढवळे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संजयआप्पा ढवळे यांनी माणगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण मंजूर पदे 50 असून भरलेली पदे 32 व रिक्त पदे 18 आहेत. शासनाने ही सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. माणगाव हा मोठा तालुका असून याठिकाणी ग्रामीण भागातून नागरिक कृषी कार्यालयात आपल्या कामासाठी येत असतात. या नागरिकांची बर्‍याचवेळा येथील रिक्त पदे भरली नसल्याने कामे होत नाहीत. त्यांना अनेकदा या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.त्याकरिता नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. तरी शासनाने नागरिकांचा विचार करत ही रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version