अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील एक हजारहून अधिक पोलीस पाटीलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत पोलीस पाटीलांवर कामाचा ताण पडत आहे. तसेच, पोलीस पाटीलांचे मानधन सुरळीत मिळत नाही. त्यांचा गेल्या 5 वर्षांचा प्रवास भत्ता प्रलंबित असून, तो देखील अद्याप मिळाला नाही. त्यामुळे पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, तसेच अन्य मागण्यांची दखल घेण्यात यावी, अशी मागमी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात 2 हजार 118 महसूली गावे आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. तर, जिल्ह्यात 868 पोलीस पाटील कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा, शांतता व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची माहिती देणे, आपत्कालीन परिस्थितीत व निवडणुकीत मदत करणे, तसेच दरोडा, शांतता भंग किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांपासून गावाला सुरक्षित ठेवणे, गैरवर्तन किंवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती संबंधित प्रशासनाला पोहोचवणे, अशा अनेक प्रकारची कामे कार्यरत पोलीस पाटील यांच्या मार्फत केली जातात. शासन आणि जनतेमधील महत्त्चाचा दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य तसेच विविध शासकीय अभियानात सहभाग घेऊन ते अभियान यशस्वी करण्यात पोलीस पाटील यांचा मोठा वाटा आहे. गावात 24 तास सतर्क राहून वरिष्ठांच्या संपर्कात राहण्याचे काम पोलीस पाटील करीत आहेत.
मात्र, जिल्ह्यात 1 हजार 121 पदे रिक्त आहेत. कित्येक वर्षे ही पोलीस पाटीलची पदे भरली गेली नाहीत. अलिबाग, कर्जत, माणगाव, रोहा, महाड या उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. श्रीवर्धन, पनवेल या उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित शंभरहून अधिक आणि पेण कार्यालयच्या अख्यत्यारित येणारी 95 पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पोलीस पाटील संघाकडून करण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचा 2011 पासून 2016 पर्यंतचा प्रवास भत्ता प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मिळावा. तसेच, पोलीस पाटील यांचे मानधन सुरळीत व्हावे, अशी मागणी देखील महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाने केली आहे.
याबाबत अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे सहसचिव कुणाल लोंढे, सल्लागार नरेश म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, विजय खुटले, सुशील म्हात्रे, अतुल घरत, संकेत कोतवाल, यशवंत जंगम, नितीन पाटील, आभा साळावकर, नारायण पाटील, अपेक्षा कोळपे आदी उपस्थित होते.
