शुक्रवारी शेवटची संधी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत यंदा असंख्य विद्यार्थ्यांची सोडतीद्वारे निवड झाली असून, या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी आता शुक्रवार (दि. 8) पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. हीच शेवटची संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, पालकांनी कोणतीही विलंब न करता आपल्या पाल्यांची कागदपत्रे तातडीने सादर करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के आरटीई कोट्यातून प्रवेश दिला जातो. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे. यासाठी प्रथम नावनोंदणी करून त्यानंतर सोडत प्रक्रिया पार पडली होती. या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीसाठी सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, अनेक पालकांकडून कागदपत्र पडताळणी पूर्ण न झाल्याने प्रशासनाने दिलासा देत ही मुदत आता 8 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हीच अंतिम मुदतवाढ असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी दिली असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
