अखेर ‘त्‍या’ पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 25 वर्षीय महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात अखेर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेच्या आईनेच याबाबत शनिवारी सायंकाळी तक्रार नोंदविली आहे.

सरिता जाधव यांच्या फिर्यादीनुसार, किशोर सखाराम जाधव असे या आरोपीचे नाव आहे. सध्या तो नागोठणे पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. मयत सोनाली व पोलीस किशोर जाधव हे माणगाव तालुक्यातील वारक येथील रहिवासी असून, नातेवाईक आहेत. सोनाली वयाच्या 12व्या वर्षांपासून किशोर जाधव यांच्या घरी घरकाम व त्याची मुले सांभाळण्यासाठी राहात होती. ती वयात आल्यावर तळा येथील एका मुलासोबत आईवडिलांनी तिचे लग्न ठरविले. तो मुलगाही सोनालीला पसंत होता. त्यानुसार चहापानाचा कार्यक्रमही ठरला. त्यामुळे काही दिवस सोनाली वारक या गावात राहात होती. त्यानंतर ती तिच्या मामाकडे तळा येथे राहात होती. तेथून कोणालाही काही न सांगता किशोर जाधव सोनालीला घेऊन गेला. याबाबत तळा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शोध लावून तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात आणून दिली.

त्यानंतर पुन्हा किशोर जाधव मार्च 2020 मध्ये तेथून तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने सोनालीसोबत पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली. मात्र, 6 नोव्हेंबर रोजी ती अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती तिच्या आई, वडिलांना एका नातेवाईकांकडून मिळाली. जाधव यानेच दवाखान्यात बोलावले आहे, असा निरोप दिला. त्यानुसार सोमवारी आईवडील दवाखान्यात गेले. त्यावेळी पोलीस जाधव याने ड्युटीवर जातो, असे सांगून तेथून तो गायब झाला. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत जाधव याच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. मुलीला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने तिला त्वचेचा आजार झाला. तिच्यावर उपचार करण्यास दिरंगाई व निष्काळजीपणा केल्याने संसर्ग होऊन मृत्यू झाला, असा आरोपही मृत मुलीच्या आईने केला आहे. दरम्यान, किशोर जाधवच तिच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप आईने तक्रारीत केला आहे.

Exit mobile version