| पेण | प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यात दुरशेत येथे एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळलेला होता. त्यावेळी सर्वांना शिना बोरा प्रकरण आठवले होते. कारण, अज्ञात महिलेचा खून सात ते आठ दिवस अगोदर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे पूर्ण मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. अखेर चित्रकारांच्या मदतीने मयत महिलेचे रेखांकित व काल्पनिक चित्र समोर आले आहे.
आठ दिवसांपूर्वी दुरशेत गावाच्या हद्दीत बाळगंगा नदीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचे शवविच्छेदन पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यावेळी या अनोळखी मयत महिलेची माहिती समोर आली होती. अंदाजे वय 25 ते 30 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 148 से.मी., उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीमध्ये ‘ए’ असे गोंदविलेले, तसेच या महिलेच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाल रंगाची नेलपेंट लावलेली दिसत होती. केसाला काळ्या रंगाचा चाप, बोटामध्ये एक अंगठी, हातात लाल रंगाची बांगडी, मयत महिलेने परिधान केलेला गाऊन असे सर्व ऐवज आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी रेखाचित्रकाराला बोलावून अज्ञात महिलेचे छायाचित्र काढण्यास सांगितले. त्यानुसार त्या महिलेचे काल्पनिक व रेखांकित चित्र पोलिसांच्या हाती लागले आहे. छायाचित्रात असलेली महिला कुणाची नातेवाईक अथवा शेजारी असेल तर त्यांनी त्वरित पेण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.