| मुंबई | प्रतिनिधी |
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून विधानं करणार्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचं वृत्त धडकताच, नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे, असं राणे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे. मंत्री नितेश राणे हे याबाबत वेगवेगळी विधाने करत आहेत. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि तंबी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. वादग्रस्त वक्तव्ये टाळावेत, अशा सूचना फडणवीसांनी राणेंना दिल्याचं सांगण्यात येत आहे.