| मुंबई | प्रतिनिधी |
पक्षाच्या भवितव्यासाठी मी निर्णय घेतला. नवं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने मी संबंथित निर्णय घेतला होता. पण माझ्या घोषणेनंतर पक्षातल्या सगळ्या सहकार्यांची तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करुन मी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाही, याची खबरदारी घेईन. त्याचवेळी तुम्हाला असं पायर्यांवर आंदोलनाला बसावं लागणार नाही, असं सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघारीचे संकेत देऊन पुन्हा अध्यक्षपद स्वीकारेन, असंच अप्रत्यक्षरित्या सांगितल्याचं बोललं जाते.
पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राज्यभरातील युवक, युवतींच्या पदाधिकारी वाय.बी. चव्हाण येथे आंदोलनाला बसले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय माघारी घ्यावा, यासाठी ते मनधरणी करत होते. आज त्याच पदाधिकार्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्या निर्णयाचा फेरविचार करुन सहकार्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेईन, असं सांगितलं.
पक्षाच्या भवितव्यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पक्षात नवं नेतृत्व तयार झालं पाहिजे, असा माझा त्यामागचा मानस होता. पण माझ्या निर्णयानंतर अनेकांच्या तीव्र भावना आहेत. हे खरंय की मी निर्णय घेताना सगळ्यांना सांगायला हवं होतं, तुम्हा सगळ्यांशी बोलायला हवं होतं. पण मी जर तुमच्याशी सल्लामसलत करुन निर्णय घेतला असता, तर तुम्ही त्यावेळी देखील नापसंती व्यक्त करुन मला निर्णय घेऊ दिला असता. पण तुम्हा सगळ्यांच्या भावना विचारात घेऊन पुढच्या 2 दिवसांत अंतिम निर्णय घेईन, असं शरद पवार यांनी सांगितलं.
पायर्यांवर आंदोलनाला बसलेले तुम्ही सगळे पदाधिकारी फक्त मुंबईतून आलेला आहात, असं नाही. तुम्ही राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून आलेला आहात. तसेच माझ्या निर्णयानंतर देशातूनही विविध राज्याचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना मला भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. माझी आणि त्यांची बैठक उद्या संध्याकाळी होईल, त्यांच्याशी बोलून 2 दिवसांत अंतिम निर्णय घेईन. पण तुमची भावना नक्की लक्षात घेतली जाईल, पण तुम्हाला अशा प्रकारे नंतर बसावं लागणार नाही, असं पवार म्हणाले.