अखेर शेकापच्या मागणीला यश

चिपळूणसाठी धावणार स्वतंत्र मेमू गाडी
| रोहा | प्रतिनिधी |

चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रोहा ते दिवा मार्गावर प्रवास करणार्‍या चाकरमान्यांनी तसेच दैनंदिन प्रवाशांनी शेकाप नेतृत्वाला धन्यवाद दिले आहेत. मंगळवारी रोहा येथे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने शेकापच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत ही मेमू सुरु केली आहे.

दिवा-रोहा मेमू गाडी गणेशोत्सव काळात चिपळूणपर्यंत चालविण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती.त्यामुळे शेकाप रोहा तालुका चिटणीस राजेश सानप यांनी चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी सोडण्यात यावी. दिवा रोहा गाडी चिपळूण पर्यंत जाऊन परत आल्यास रायगड जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय होईल .रोह्यापासून पुढे प्रवाशांना गाडीत चढणे देखील शक्य होणार नाही ही बाब 24 ऑगस्ट रोजी सांगितली होती.पण रेल्वे प्रशासनाने आपला हेका कायम ठेवत सदर गाडी चिपळूणपर्यंत चालविल्याने मंगळवारी रोहा येथे प्रवाशांचा उद्रेक झाला. दिवा- चिपळूण मेमू गाडी संतप्त प्रवाशांनी सुमारे अर्धा तास रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी सोडण्याची घोषणा रेल्वे खात्याने केली असून शेकापच्या मागणीला यश आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

पनवेल ते रोहा मार्गावर लोकल ट्रेन चालू व्हावी या मागणीसाठी देखील रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. लोकल ट्रेनची मागणी तातडीने मान्य न झाल्यास शेकापच्यावतीने आंदोलन करण्यात येईल

– राजेश सानप,तालुका चिटणीस


Exit mobile version