मुख्यमंत्री यांनी ज्यूस देऊन उपोषणाला स्थगिती
। जालना । वृत्तसंस्था ।
मराठ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे आज दि.14 रोजी उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूस देऊन स्थगित केले. त्यामुळे 17 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रावर 31 दिवसांचा अवधी देत उपोषण स्थगित करण्याचा प्रस्ताव देताना पाच अटीही घातल्या होत्या. त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांना सुद्दा उपोषणस्थळी येण्याची अट घातली होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर जालन्यातील आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी पोहोचले. यानंतर हसतमुख वातावरणात मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारी शिष्टमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जाण्याचे टाळले. चंद्रकांत पाटील जाणार असल्याची चर्चा होती, पण ते सुद्धा गेले नाहीत.