अखेर जनसुनावणी पार पडली

| अलिबाग | प्रतिनिधी |

थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ)च्या प्रस्तावित विस्तार प्रकल्पाबाबतची जनसुनावणी मंगळवारी अखेर पार पडली. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी न येताच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आजच्या सुनावणीला उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे हजर होत्या. आरसीएफच्या थळ कारखान्याच्या सध्याच्याच जागेत नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम अर्थात एनपीके उत्पादनाचा आणखी एक प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सुमारे 954 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, दररोज 1200 मेट्रिक टन उत्पादनाची त्याची क्षमता असेल.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या प्रकल्पाची पर्यावरणीय सुनावणी आज घेण्यात आली. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हे तिला हजर राहिले नव्हते. प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या देण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांवरून बराच गोंधळ झाला व सुनावणी रद्द झाल्याचे आमदारांतर्फे परस्परच जाहीर करण्यात आले होते. त्यावरून स्थानिक नागरिकांनी संतापही व्यक्त केला होता.

या पार्श्‍वभूमीवर आजच्या सुनावणीकडे सर्वांचे डोळे लागले होते. पोलीस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला होता. आरंभीच आमदारांची पत्नी मानसी दळवी यांनी प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा उपस्थित केला व त्यावर गोंधळ झाला. त्यामुळे पुन्हा एकवार सुनावणी पुढे ढकलण्याचा हा डाव आहे की काय, अशी शंका काही जणांना वाटू लागली. परंतु, प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला गेला हे आजच्या सुनावणीच्या इतिवृत्तात नोंद केले जाईल, असे आश्‍वासन प्रशासनातर्फे देण्यात आल्यानंतर हा विरोध शांत झाला. याबाबतचे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रशासन जे निर्देश देईल त्यांचे पालन केले जाईल, अशी भूमिका आरसीएफ व्यवस्थापनाच्या वतीने मांडण्यात आली.

आजची सुनावणी मुख्यतः पर्यावरणाशी निगडित बाबींसंदर्भातील होती. स्थानिकांनी याबाबतचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. आरसीएफतर्फे त्यांना उत्तरे देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी याच्या नोंदी घेतल्या असून, ते आपला अहवाल प्रशासनाला सादर करतील. या विस्तारित प्रकल्पाला पर्यावरणविषयक हिरवा कंदील मिळाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी त्याचा मार्ग मोकळा होईल.

Exit mobile version