। नाशिक । वृत्तसंस्था ।
अखेर पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर शेतकरी लॉन्ग मार्च माघारी फिरणार आहे. माजी आमदार जे.पी.गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या लॉन्ग मार्चमध्ये पुरुष शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. आज माजी आमदार जे.पी.गावित आणि संबंधित अधिकारी यांच्याशी बैठक पार पडली. या बैठकीनंतर जे.पी.गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गावित म्हणाले की, “राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत.” जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
पुंडलिक जाधव या 55 वर्षीय शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्या गावाकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आमचा शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी पुंडलिक जाधव यांच्या गावकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सध्या दहा गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत. शेतकरी माघार घेतील तेव्हा याच गाड्यातून आम्ही त्यांना नाशिकला सोडणार आहे अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.