| सातारा | वृत्तसंस्था |
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरु होती. उदयनराजे यांनी देखील आपल्यापरीने तयारी सुरु केली होती. अखेर भाजपकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. पण, अद्याप उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. शशिकांत शिंदे यांनी देखील शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे उदयनराजेंना उमेदवारी जाहीर होईल की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर भाजपने आज त्यांच्या नावाची घोषणा करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केला होता. उदयनराजे यांनी साताऱ्यातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पण, उदयनराजे यांना घड्याळ नाही तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची होती. त्यामुळेच साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यास महायुतीला उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे.