। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील शाहीन उर्दू शाळेस म्हसळ्यातील तरुण उद्योजक सईद अहमद जहीर कादिरी यांच्या विशेष प्रयत्नातून पोस्को स्टील एक्वायर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक विकास यासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देऊन शैक्षणिक कार्यात हातभार लावला असून, या मदतीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी कोरियन कंपनीचे व्यवस्थापक एम.डी. मंचिकून, सिनियर मॅनेजर सुधीर भोसले, सईद अहमद कादिरी, निलेश चिखले, प्रशांत सानप, मुख्याध्यापक इक्बाल नझिर, माजिद हजवाने, मुश्ताक हुरझूक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी व्यवस्थापक एम.डी. मंचिकून यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. जीवनात नकारात्मक विचार चुकूनही मनात न आणता भविष्यात पुढे जाऊन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंचिकून यांनी केले. यापूर्वीही पोस्को कंपनीच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची सुविधा प्राप्त व्हावी या दृष्टीने विद्यालयास वॉटर कुलर भेट दिली होती.