राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
| मुंबई | प्रतिनिधी |
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला.
पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीतील तीन रहिवासी ठार झाले आहेत. तसेच एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. संजय लेले (44), अतुल मोने (52) आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. तर, संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तोदेखील जखमी झाला आहे. तर, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पनवेलमधील दिपील भोसले (60) यांचादेखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेले आहे.
आसावरी म्हणाली, राज्य सरकार पीडित कुटुंबांसाठी जे काही करतंय त्याबद्दल मी मुख्यमंत्री व इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते. त्या सर्वांनी आम्हाला सांगितलं आहे की ते आमच्याबरोबर आहेत. या कठीण काळात आमच्या कुटुंबांबरोबर आहेत. सरकारमधील प्रत्येकजण आम्हाला मदत करेल. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला आर्थिक मदत व मला शासकीय नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याबद्दल मी शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानते.
संतोष जगदाळे यांची कन्या म्हणाली, शासकीय नोकरी करणं हे माझं स्वप्न नव्हतं. मात्र, हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. मी मोठ्या शासकीय हुद्द्यावर काम करावं अशी त्यांची इच्छा होती. मी लोकांच्या मदतीस यावं असं त्यांना वाटत होतं. मी त्यांचा मुलगा म्हणूनच पुढच्या जबाबदार्या पार पाडाव्या असं त्यांना वाटायचं. कारण ते मुलगा व मुलगी असा भेदभाव करत नव्हते. त्यांनी मला मुलासारखंच वाढवलं आहे. तूच माझी मुलगी, तूच माझा मुलगा आहेस असं माझे वडील नेहमी म्हणायचे. त्यांची इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी किंवा सरकारशी संबंधित एखाद्या ठिकाणी काम करावं, तिथे माझी मदत व्हावी. आता मला वाटतं आहे की त्यांची इच्छा कुठेतरी पूर्ण होत आहे.






