‌‘हिचडी’मुळे आर्थिक कोंडी

मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

सततच्या बदलत्या हवामानामुळे उलथापालथ होत असून, समुद्रात मोठी मासळी मिळत नसल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. पैसे नसल्याने अनेकांना प्रपंच चालविणे अवघड बनले आहे. मुरूड, एकदरा, राजपुरी आदी खाड्यांतून अनेक होड्या समुद्रकिनारी बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहेत.

ऐन मोसमात मोठी मासळी किंवा कोलंबीदेखील मिळत नसल्याने मच्छिमारांना प्रपंच चालविणे मुश्किल झालेले दिसून येत आहे. एकदरा येथील काही छोट्या नौकांना छोटी हिचडी (मिक्स अगदी छोटी मासळी) मिळाल्याचे एकदरा येथील नाखवा रोहन निशानदार यांनी गुरुवारी सांगितले. मोठ्या नौकांची मासेमारी बंद आहे. मासळीला बोली भाषेत ‌‘खेंगाट’ किंवा ‌‘हिचडी’देखील म्हटले जाते. ही हिचडी मासळी निवडून साफ करण्यात खूप वेळ खर्च करावा लावतोय. यामध्ये छोटी खेकडी, बारीक ढोमी मासळी मिळते. यातून फारसा आर्थिक फायदादेखील नसल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. घरात पैसे नसल्याने कुटुंबप्रमुख हवालदिल आहेत. प्रत्यक्षात मच्छिमारांची आर्थिक कोंडी झाली असून, शासनाकडून पारंपरिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य केले जात नसल्याने असंतोष वाढीस लागला आहे, असे सांगण्यात आले.

नाखवा रोहन निशानदार म्हणाले की, मुरूड मार्केटमध्ये अगदी काही प्रमाणात कोलंबी येत असली तरी प्रमाण अल्प असल्याने मासेमारी परवडण्यापलीकडे गेली आहे. हिचडी मासळीमुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत आहे. रत्नागिरीपासून रायगडपर्यंत समुद्रात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याचे अनेक मच्छिमारांनी सांगितले. बाहेर गावांतून मुरूड मार्केटमध्ये मासळी येत असल्याची माहिती मिळाली. वादळी पाऊस, अवकाळी पाऊस, जेलिफिशचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे मासेमारी सातत्याने बंद पडली होती. आता नवीन प्रकाराला पारंपरिक मच्छिमारांना तोंड द्यावे लागत आहे.

बदलत्या वातावरणामुळे मासेमारी वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे डिझेल भरून समुद्रात मासेमारीस जाऊन अधिक नुकसान करून घेण्यापेक्षा मच्छिमारांनी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवल्याचे सांगण्यात आले.

पांडुरंग आगरकर,
अध्यक्ष, एकदरा गाव कोळी समाज
Exit mobile version