मच्छिमार झाले हवालदिल
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड च्या समुद्रात कोळी नंतर मासळी मिळण्याचे प्रमाण वेगाने घटले असून कधी कोलंबी तर कधी सफेद जवळा अशी पोटापुरती मासळी अधून मधून मिळत असल्याची माहिती एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी दिली. त्या मुळे अनेक मच्चीमारांनी आपल्या नौका किनार्यावर नांगरल्या आहेत. मासळी कधी मिळेल किंवा नाही याचा नेमच राहिलेला दिसून येत आहे. मोठीं पापलेट, रावस, सुरमई सारखी बाहेरगावहून येणारी मोठी मासळी तर जवळ जवळ मुरूड मार्केट मधे अभावानेच दिसते.
समुद्राकडून जाणार्या एकदरा, राजपूरी, दिघी, खामदे, कुडगाव, हरवीत, मांदाड, राहाटाड, तुरम्बवाडी, वावे हवेली, कुडगाव, मेंदडी, आदी मोठया खाडी पट्यात सिझन असूनही सफेद जवळा, आंबाड, मांदेली, कोलंबी आदी मासळी देखील मिळत नसल्याने येथील गरीब सामान्य कोळी मच्चीमार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. नौकेला लागणारे डिझेल आणि खलाशांचा खर्च देखील सुटत नसल्याने मच्चीमार मंडळीना मोठया आर्थिक विवनचनेला तोंड द्यावे लागत आहे. कोळीवाड्यात अनेक मच्चीमारांना घरखर्चा साठी देखील हाताशी पैसे नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.
तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सांगितले की, या 15 ते 20 किमी च्या खाडीपट्यात 13 गाव कोळी बांधवांची मोठी वस्ती असून येथे छोटी सिझनल मासळी देखील मिळत नसल्याने मासळीचा मोठा दुष्काळ पडला आहे. कोलंबी, जवळा देखील नसल्याने दुष्काळाची तीव्रता मोठी असल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले. कोलंबी चे सोडे, बोंबील, सुकट, वाकट्या देखील दुर्मिळ झाल्याने मासळीचा सुका बाजार देखील पूर्णतः कोलमडून गेला आहे.असे का झाले आहे याचे कोडे असून अशी परिस्थिती बदलून पुन्हा पूर्वपदावर येणे अवघड असल्याचे दिसून येत आहे. मच्चीमारांवर फार मोठा बाका प्रसंग येण्याची चिन्हे यातून दिसत आहेत.