मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक

बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग डोळे झाकून बघत असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत येणारी सर्वच कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक महाविद्यालये, इंजिनिअरिंग, फार्मसी, विधी महाविद्यालये ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशा वेळीच संपूर्ण शुल्क आकारित असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वास्तविकता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मागास प्रवर्गातील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त भटक्या जातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशा वेळी 120 रुपये शुल्क आकारून प्रवेश देण्याचे आदेश महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांना देण्यात आले होते . मुंबई विद्यापीठानेसुद्धा सन 2004 पासून स्वतंत्र परिपत्रक काढून महाविद्यालयांनी अंमलबजावणी करावी असा आदेश पारित केला. हाच आदेश आजही मुंबई विद्यापीठातील संपूर्ण महाविद्यालयांना लागू आहे.

यामध्ये खास करूप मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत येणारे नवी मुंबई, विद्याविहार, ठाणे, घाटकोपर, भिवंडी, खोपोली, कुडूस वाडा, वाडा, कल्याण, ठाणे येथील महाविद्यालयांत वार्षिक शुल्का सहित अतिरिक्त शुल्क मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेत असल्याचा आरोप अनिल वाणी यांनी केला असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नियंत्रण संबंधीत महाविद्यालयांवरती नसल्यामुळे बरेचसे मागासवर्गीय विद्यार्थी पैशाअभावी गुणवत्ता यादीत नाव येऊनसुद्धा प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यामुळे दरवर्षी साधारण 20 टक्के मागासवर्गीय विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Exit mobile version