Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

रोहा पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; कार, रोकड, मोबाईलसह बनावट शिक्के जप्त

| रोहा | प्रतिनिधी |

व्यवसायासाठी तब्बल 20 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध कारणांसाठी पैसे उकळून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना रोहा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून बनावट कागदपत्रे, पतसंस्थेचे शिक्के, पावती पुस्तके, रोकड, मोबाईल आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या तपासात या आरोपींनी रोहा परिसरातील तब्बल 23 जणांची कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रोहा तालुक्यातील सुडकोली येथील लियाकत महमद खोत यांनी वर्तमानपत्रातील जाहिरात पत्रिकेत ‌‘समर्थ फायनान्शियल सर्विसेस‌’च्या माध्यमातून व्यवसायिक कर्ज, महिलांसाठी बचतगट तसेच लघुउद्योगासाठी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी जाहिरात पाहिली होती. त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता आरोपींनी 20 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी विविध कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल 46 हजार 400 रुपये घेण्यात आले. त्यानंतर विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित, पालघर या संस्थेच्या नावाने शेअर्स दिल्याचे तसेच कर्ज मंजूर झाल्याचे भासविणारी बनावट कागदपत्रे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रोहा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक तसेच रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर 15 ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार रवींद्र हटले (40, सध्या रा. बदलापूर, ठाणे; मूळ रा. गोठणे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) आणि गौरव संतोष मयेकर ऊर्फ भालचंद्र रघुनाथ पालव (38) सध्या रा. उलवे, नवी मुंबई; मूळ रा. मठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीची ह्युंदाई व्हर्ना कार, 30 हजार रुपये रोख, सुमारे एक लाख रुपये किमतीचा सॅमसंग झेड फोल्ड 4 मोबाईल आणि आणखी एक सुमारे एक लाख रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. याशिवाय पतसंस्थेच्या नावाचे बनावट शिक्के, पावती पुस्तके, नागरिकांना दिलेल्या पावत्या, आधारकार्ड, धनादेश पुस्तिका, पासबुक तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपींनी रोहा परिसरातील आणखी 23 जणांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आरोपींकडून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार किंवा तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस नाईक कैलास बेल्हेकर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील, अमित चाळेकर आदींचा सहभाग होता. पुढील तपास रोहा पोलीस करीत आहेत.

Exit mobile version