माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट

थकीत वीजबिले 35 लाखावर; 10 लाखाचा चेक देऊन पुरवठा सुरू

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नगरपरिषदेत आर्थिक लूट दिसून येत असून, शहरातील पालिकेच्या वास्तू अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या वस्तुंसाठी केला जाणारा वीज पुरवठ्यांची थकबाकी आता 35 लाखावर पोहचली आहे. दरम्यान, पालिकेच्या 54 वास्तूंमध्ये सुरू असलेला वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी 10 लाखाचा धनादेश महावितरण कंपनीला दिला आहे. मात्र, आर्थिक लूट होईल अशा वस्तूंच्या खरेदीवर पालिकेचे नियंत्रण नसल्याने माथेरान पालिकेच्या तिजोरीत आणखी खळखळाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या 54 वास्तूंमधील वेगवेगळ्या उपक्रमांना वीज पुरवठा करीत असते. त्यात शाळा, कार्यालय, मार्केट, घोड्यांचे तबेले, सार्वजनिक दिवाबत्ती व चार्जिंग स्टेशन इत्यादी ठिकाणी वीज पुरवठा महावितरणकडून केला जातो. या बदल्यात महावितरणकडून देण्यात आलेली वीज थकबाकी आता 35 लाख 33 हजारावर जाऊन पोहचली आहे. माथेरान पालिकेने मागील काही महिन्यांत आवश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी केली असून, त्यापोटी काही कोटींची बिले अदा केली आहेत आणि त्यामुळे माथेरान पालिका आर्थिक संकटात आली आहे. माथेरान नगरपरिषदच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रशासनाला वीज बिल थकबाकी भरण्यासाठी निधीची कमतरता आहे. त्यातील माथेरान नगरपालिका कार्यालय, प्राथमिक शाळा, मंदिर, घोडा तबेला, व्यायामशाळा, दस्तूरी नाका, काही स्ट्रीट लाईट, सुलभ शौचालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणचा वीज पुरवठा बंद झाला आहे. काही ठिकाणी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्पुरती वीज सुरू ठेवली गेली आहे.

माथेरान पालिकेने प्रशासक काळात 38 लाखाचे एक ई-टॉयलेट असे एकूण 8 म्हणजेच जवळपास 3 करोड निधी खर्च करून खरेदी केलेले आहेत. शहरात अशा कोणत्याही ई-टॉयलेटची आवश्यकता नसतानाही त्याच्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्याचवेळी शहरात कचरा कुंड्या जंगल भागात शेकडो पडल्या आहेत. तरी देखील नव्याने कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. त्याचवेळी पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर खरेदी केले असून, त्यांच्यासाठी देखील कोटींची बिले नगरपरिषदेने संबंधित कामावर खर्च केले आहे. यापैकी कोणत्याही वस्तूची तात्काळ आवश्यकता माथेरान शहरात नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी आर्थिक फायद्यासाठी केलेले साहित्य खरेदी माथेरान पालिकेला आर्थिक कोंडीत टाकून गेली आहे. तसेच, बांधकाम व लाईट देखरेख विभागासाठी, प्रिंटिंग, आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभागांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यादेश देऊन अनावश्यक वस्तू मागविण्यात आल्या आहेत. कार्यालयाचे अधीक्षक सदानंद इंगळे यांना या वस्तू सांभाळण्याची जबाबदारी असून ते कार्यालयात बसून आलेल्या वस्तूंची नोंद ठेवत आहेत. त्यामुळे खरोखर या वस्तू माथेरान पालिकेकडे आल्या आहेत का? हा संशोधनाचा विषय बनला आहे. हा सर्व आर्थिक व्यवहार सुरू असताना माथेरान पालिकेच्या तिजोरीत खळखळाट आहे.

महावितरणला दिलेला धनादेश वटणार का?
माथेरान गावातील सार्वजनिक ठिकाणे काळोखात गेली आहेत. शहरात गोंगाट झाल्याने माथेरान पालिकेने वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून 10 लाखाचा धनादेश 27 फेब्रुवारी रोजी महावितरण कंपनीला दिला आहे. मात्र, हीच माथेरान पालिका आपल्या ठेकेदारांना त्यांची सर्व बिले एनईएफटी करून देण्यात आग्रही असते. त्यामुळे महावितरण कंपनीला दिलेला धनादेश बँकेत वटणार का? असा प्रश्न माथेरान शहरातील नागरिकांना पडला आहे.
Exit mobile version