लेक लाडकी योजनेतून 3 कोटी 25 लाखांचा निधी वितरीत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासोबतच बालविवाहाला आळा घालण्यासाठी लाडक्या लेकींना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 6 हजार 500 मुलींना तब्बल 3 कोटी 25 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरीत करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
मुलींचे अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विवाह लावणे, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्याकडे दुय्यम नजरेने पाहणे, प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात येणारा अभाव अशा विविध कारणांमुळे मुलींच्या शिक्षणावर तसेच त्यांच्या बौद्धिक विकासावर मर्यादा येतात. या समस्यांवर उपाय म्हणून शासनाने पुढाकार घेत मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू केली आहे.
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचा जन्मदर वाढविणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे तसेच कुपोषण कमी करणे या उद्देशाने महिला व बाल विकास विभागांतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेनुसार, मुलीच्या जन्मावेळी 5 हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8 हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये असा टप्प्याटप्प्याने लाभ दिला जातो. अशा प्रकारे एका लाभार्थी मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील 5 हजार रुपयांप्रमाणे 6 हजार 500 मुलींच्या खात्यात एकूण 3 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाडक्या लेकींना आर्थिक आधार मिळाला असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांनी दिली.
अटी व शर्ती
लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक. 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींनाच योजनेचा लाभ लागू. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीलाही योजनेचा लाभ मिळणार. पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यावेळी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यावेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी मुलगी व तिच्या मातेसोबत संयुक्त बँक खाते असणे आवश्यक; पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक. अंतिम लाभ घेण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा.
