। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न समिती परिसरातील धान्य बाजारात आग लागण्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.5) सकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
नवी मुंबई कृषी उत्पन्न समिती परिसरातील फळ बाजारात आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दोन आठवड्यांपूर्वी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर आगीची घटना घडली होती. यामध्ये 10 ते 15 गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले होते तर बहुतांश गाळ्यांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा धान्य बाजारात ए विंग लगत असलेल्या पत्र्याच्या स्टॉलला भीषण आग लागली.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या स्टॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगीने आणखी पेट घेतल्याने स्टॉल जळून खाक झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु फळ बाजारानंतर पुन्हा धान्य बाजारात लागलेल्या आगीने एपीएमसीमधील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
या आगीने पुन्हा एपीएमसी आवारातील अग्नीसुरक्षा उपयोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. एपीएमसीतील अग्नीसुरक्षा वार्यावर असून या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास येथील व्यापारी, माथाडी कर्मचारी तसेच ग्राहक यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.