व्यापार्याचे लाखोंचे नुकसान
| महाड । प्रतिनिधी |
महाड शहरातील तांबटआळी येथील एका बंद घराला आग लागण्याची घटना घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबटआळी येथील लक्ष्मी मेटल या भांड्याच्या दुकानाचे व्यापारी विलास पोटफोडे यांनी आपल्या दुकानाच्या नवीन पत्राशेडचे काम सुरू असल्याकारणाने, आपल्या दुकानातील माल शेजारील रामचंद्र वडके यांच्या जुन्या घरामध्ये तात्पुरत्या सोयीसाठी ठेवला होता. अचानक (दि.20) सकाळी नऊच्या सुमारास या घरातून धूर येत असल्याचे रहिवाशांना दिसले. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती महाड नगरपरिषद अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरामध्ये प्रवेश करून अथक प्रयत्नाने आग विझवली. परंतु या आगीमध्ये विलास पोटफोडे यांच्या मालाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळतात आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळाला भेट दिली. या अग्नितांडवामध्ये महाड अग्निशमन दलातर्फे गणेश पाटील, गोविंद साळुंखे, शेखर भोसले, श्रीकांत साळुंके, अमर पवार, गौरव देशमुख, चालक गणेश विनहेरकर यांनी त्वरीत येऊन मोलाची कामगिरी बजावली. तसेच आपदा मित्र, अमित संजय खैरे, अभिताभ सदानंद जाधव, सुजल पवार, आदित्य गलांडे, मंगेश साळुंखे यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले.