सलग घटनांनी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर
। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील भेंडखळ गावाजवळील कॉनएक्स सीएफएस येथे बुधवारी (दि.22) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही प्रमाणात माल जळाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व सिव्हिल डिफेन्सची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी वेळेवर कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गव्हाणफाटा येथील जेडब्ल्यूआर गोदामाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच ही दुसरी घटना घडल्याने उरण तालुक्यातील गोदामांमधील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील काही ठिकाणी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या गोदामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची चर्चा असून, यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तातडीने लक्ष देऊन अशा गोदामांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






