| कर्जत | संजय गायकवाड |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला आज दि.5 पहाटेच्या सुमारास आग लागली असून बँकेतील कागदपत्रे, संगणक, फर्निचर आदी साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
आज पहाटे साडे चार च्या सुमारास कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरा वरील पहिल्या मजल्यावर असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला आग लागली. या घटनेची माहिती समजताच कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी संपल्याने आग विझविण्यात व्यत्यय आला. अग्निशमन दलाची गाडी पाणी भरण्यासाठी पुन्हा गेली. त्या दरम्यान सहाच्या सुमारास खोपोली नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी आली परंतु त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर थोड्याच वेळात पाणी भरण्यासाठी गेलेली कर्जत नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी आली आणि जवानांनी आग विझविली.”
बँकेत आग लागल्याचे माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतिश शिंदे,पोलीस हवालदार प्रविण लोखंडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, भरत पावरा, श्री कपालेश्वर मंदिराचे ट्रस्टी अभिजित मराठे, प्रशांत कारूळकर, महेंद्र बोडके, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे निलेश परदेशी, सदानंद जोशी, विवेक भागवत हे घटनास्थळी पोहचले. अभिजित मराठे, निलेश परदेशी अन्य उपस्थित नागरिक यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, यावेळी बँकेचे माजी संचालक विलास थोरवे, संचालक राजेंद्र हजारे, कर्मचारी शाखाधिकारी संगीता भोईर, प्रमोद कुळकर्णी आणि अन्य कर्मचारी या ठिकाणी पोहचले.
कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, विवेक दांडेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या आगीत बँकेतील कागदपत्रे, संगणक, फर्निचर व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिक्षक कर्मचारी, शेतकरी, सहकारी संस्था यांची खाती मोठया प्रमाणात आहे, खातेदारांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून उद्या पासून मारुती मंदिराच्या इमारतीमध्ये बँक चालू करण्यात येईल अशी माहिती बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे यांनी दिली.