| पाली | प्रतिनिधी ।
खोपोली महामार्गावर दापोडे येथील मांढरे पेट्रोल पंपासमोर भंगार व जुन्या लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग वणव्यामुळे लागली होती. यामध्ये दोन्ही गोदामातील सामान व गोदामाबाहेर उभी असलेली तीन चाकी जळून खाक झाली आहे. भंगार गोदाम हे खुर्शीद खान व जुन्या लाकडाचे गोदाम शंभू गुप्ता यांचे होते. बाजूच्या शेतात लागलेल्या वणव्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. नगरसेवक सुलतान बेनसेकर यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ आमडोशी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीची व रिलायन्स नागोठणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून पाली पोलिसांना कळवले. तत्पूर्वी स्पीड इंटरप्राईजेस च्या पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी लागलेली आग विझवली.