| माथेरान | वार्ताहर |
माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या मेजवानी हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी (दि.09) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पर्यटक रुममधून बाहेर पडल्याने या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली. मात्र, रुममधील इलेक्ट्रिक सामान आणि बेड संपूर्णतः जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. तर, नेहमीप्रमाणे माथेरान येथील अग्निशामक वाहनावर चालकच उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. ही घटना रहदारीच्या ठिकाणी घडल्याने एकच खळबळ उडाली होती.
माथेरान शहरात सध्या मोठ्या प्रमाणत पर्यटक थंड हवा खाण्यासाठी येत आहेत. दरम्यान, असे असताना बुधवारी माथेरानच्या मुख्य बाजारपेठ श्रीराम चौक परिसरात असलेले हॉटेल मेजवानीच्या पहिल्या मजल्यावर एका रूमला आग लागली. हॉटेलमधील पर्यटक रुममधील पंखा चालूच ठेवून फिरण्यासाठी म्हणून बाजारात गेले होते. त्यावेळी पंख्याच्या येथे शॉर्टसर्किट झाल्याने पंखा जळून बेडवर पडला, त्यानंतर येथील रूममधून आगीच्या धुराचे लोट बाहेर पडताच ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यानुसार सर्वच जण आग विझवण्यासाठी रूमच्या दिशेने धावून आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमधील शशी नायक या तरुणाने प्रसंगावधान राखत ज्या रुममध्ये आग लागली होती त्या रूमची काचेची खिडकी तोडून रूममधील सिलिंग तसेच बेडवरील गादी, दरवाजा, एसी, टीव्ही यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची फवारणी केली. त्यामुळे संपूर्ण आग आटोक्यात आणून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. मात्र, नेहमी प्रमाणे माथेरान नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनावर चालकच उपलब्ध नसल्याने जवळपास तासाभराने अग्निक्षमक वाहन घटनास्थळावर पोहोचले.
माथेरान शहरात गेल्या एक महिन्यातील आगीची ही चौथी घटना असून, नादुरुस्त तसेच ऑपरेटर नसलेल्या अग्निशमन वाहनाचा हा खेळ खंडोबा पालिकेकडून असाच सुरू असून घटनांचे गांभीर्य नसल्याने पालिका प्रशासनाकडून दिसून येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. एकूणच घडलेल्या घटनेत हॉटेलमधील एसी, टिव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व लाकडी वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पर्यटक हे बाजार खरेदीसाठी गेले म्हणूनच त्यांचे प्राण वाचले असल्याचे देखील बोलले जात आहे.