मुरुडमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत शॉर्ट सर्किटमुळे आग

। कोर्लई । प्रतिनिधी ।

मुरुड शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे वगळता कोरी पासबुके व जुन्या साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने ईद ए मिलाद ची सुट्टी असल्याने जिवितहानी टळली.

सकाळी अकरा साडेअकरा दरम्यान बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट येत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. आज ईद ए मिलाद ची सुट्टी असल्याने कामकाज बंद होते, परंतु काही कामांसाठी कर्मचारी येथे आले असता, बॅंकेच्या दुसऱ्या मजल्यावर वीजेचा स्विच बोर्ड मध्ये शॉर्ट सर्किट होऊन जळून खाक झाला होता. त्यामुळे कोरी पासबुके व जुन्या साहित्याचे जळून नुकसान झाले तर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याचे समजते. आग लागल्याचे समजताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात आली.

Exit mobile version