आगीत भाताचे शेकडो भारे खाक

खारपेढांबे येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; पंचनामा करून गुन्हा दाखल

| वाघ्रण | प्रतिनिधी |

खारपेढांबे येथील शेतकरी राजेश मधुकर पाटील यांच्या भाताच्या उडव्याला आग लागून 206 भाताचे भारे जळून खाक झाले. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश पाटील यांनी यंदा गट क्रमांक 93 आणि 94 मध्ये भाताची लागवड केली होती. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या शेतीत त्यांनी मेहनत घेऊन चांगले पीक घेतले होते. 14 नोव्हेंबर रोजी भाताची बांधणी करून शेताच्या मध्यभागी उडवे रचले होते. मात्र, अचानक लागलेल्या आगीत वर्षभराची मेहनत जळून खाक झाली.

युवराज पाटील या युवकाने आग लागल्याचे राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. सरपंच राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता आणि जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आग विझवणे शक्य झाले नाही.

याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दीपाली शिंदे यांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी मानकुळे सजेच्या महसूल अधिकारी निशा पाटील, ग्रामपंचायत वाघ्रणच्या अधिकारी सुवर्णा संजय पाटील आणि सरपंच राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने पंचनामा केला.

या दुर्घटनेमुळे राजेश पाटील आणि त्यांचे कुटुंबीय हतबल झाले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version