दिवेआगरमध्ये वाड्याला आग; लाखोंचे नुकसान

। दिघी । वार्ताहर ।
दिवेआगर येथील शेतकरी माधव विश्‍वनाथ अवसळकर यांच्या वाड्याला बुधवारी (दि.27) रात्री पावणेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बागेतील सुपारी व भात पेंढ्यासह संपूर्ण वाड्याचे 12 लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

अवळसकर यांनी या वाड्यात जनावरांना चारा म्हणून आवश्यक असणार्‍या पेंढ्यासह मोठया प्रमाणात साठवलेली बागेतील असुली सुपारी व इतर शेत कामासाठी लागणारी सामुग्री ठेवली होती. रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे वाड्याला अचानक आग लागली.हे समजताच ग्रामस्थांनी तातडीने वाड्याच विद्युत पुरवठा बंद केला. तसेच पाण्याचा वापर करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. रात्रभर धुमसत असलेल्या भीषण आगीमध्ये वाड्यातील सुमारे 3000 किलो सुपारी व पेंढा जळून खाक झाले.

या आगीमुळे आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे आग विजवण्याच्या प्रयत्न करणार्‍या नागरिकांना त्रास होत होता. वाड्यातील पेटता पेंढा बाहेर काढत व पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्री घडलेल्या या घटनेमुळे आगीला रोखणे कठीण होऊन बसले.

दिवेआगर येथील तलाठी निलेश पवार व कर्मचारी गणेश महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी आगीत शेती साहित्याचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अवसळकर यांनी केली आहे.

अग्निशमन यंत्रणाची कसरत
ही आग विझविण्यासाठी गुरुवारी पहाटे नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र, त्या वाहनामध्ये पाणीसाठा कमी असल्याने आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

Exit mobile version