अलिबागेतील रामधरणेश्वर डोंगरावर आग

| सोगाव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगराच्या सोगाव भागातील खालच्या बाजूला मंगळवारी (दि.3) दुपारच्या वेळी आग लागल्याची घटना घडली. ही आग समाजकंटकांकडून लावण्यात आली असून, त्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गेल्या काही महिन्यांपासून अलिबाग तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. अशातच मंगळवारी रामधरणेश्वर डोंगर भागात समाजकंटकांकडून आग लावण्याची घटना घडल्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, या वणव्यात डोंगरावर असणाऱ्या पशु-पक्षांचा नैसर्गिक अधिवास आणि खाद्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे डोंगरावरील बिबट्या, तरस, रानडुकरे, माकडे, सरपणारे प्राणी आदी जंगली प्राणी मानवी वस्तीकडे येऊन अधिकच धोका निर्माण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, यापुढे वनविभागाने वणवा लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच वनविभागाने वनकर्मचारी यांच्यामार्फत डोंगर भागात गस्त वाढवून पर्यावरण वाचविण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी वनविभागाकडे केली आहे.

Exit mobile version