भाताच्या उडव्यांना आग

वर्षभराच्या कमाईची राखरांगोळी
शेतकर्‍यावर आर्थिक संकट
रसायनी | वार्ताहर |
लोधिवली नजीकच्या वयाळ गावात भाताच्या उडव्यांना आग लागून शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभराच्या कमाईची अशी राखरांगोळी झाल्यामुळे शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
वयाळ या गावातील भरत मारुती म्हात्रे यांच्या शेतातच भात कापून भाताची तीन उडवी रचून ठेवली होती. मध्यरात्री तिन्ही उडवी जळून खाक झाल्याचे सकाळी शेतावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले. रत्ना जातीचे भातपीक होते. तिन्ही मिळून सुमारे 400 भारे (पेंडी) होते.
याबाबतची माहिती मिळताच चौकचे पोलीस हवालदार बागुल व राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. रीतसर पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे. सपोनि युवराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शासकीय कर्मचार्‍यांना दिवाळीची सलग सुट्टी असल्याने तलाठी, शेती विभागातील कर्मचारी मदतीला येऊ शकले नाहीत. तसेच महसूल विभागाच्या वतीने पंचनामा झाला नाही. याबाबत तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे.

Exit mobile version