। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
रोडपाली परिसरात मांज्यात अडकून पडलेल्या एका कबुतराची सुटका पनवेल पालिकेच्या कळंबोली अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. अथक प्रयत्नाने कबुतराची सुटका करणार्या जवानांचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नेहमीच धावून जाणार्या अग्निशमन दलाच्या जवानांना अनेकदा अडचणीत सापडलेल्या पशु पक्षांच्या सुटकेसाठी धावावे लागत असते. अनेक पशु पक्षांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
रविवारी देखील कळंबोली रोडपाली परिसरातील सेक्टर 15 येथील केबलवर पंतगीच्या मांज्यात एक कबुतर अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच घटना स्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवन मृत्यूशी झुंजणार्या कबुतराची सुटका केली. जवानांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत उपस्थितांनी अभिनंदन केले.