। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरूड एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पोषण भी पढाई भी, अंगणवाडी सेविका प्रशिक्षणाचे आयोजन मुरुड दरबार हॉलमध्ये घेण्यात आले होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल बागल, मुरूड प्रकल्प विस्तार अधिकारी संजय शेंडगे, प्रवेक्षिका सुर्वणा चांदोरकर, शुभांगी कोतवाल, आशा सोनकुसरे, अदानी फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, विजया खेऊर, किरण शिंदे, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आदिंसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले, राजे शिवछत्रपती महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे म्हणाले की, पोषण भी पढाई भी या कार्यक्रमाचा उद्देश लहान मुलांच्या पोषणाबरोबरच त्यांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन देणे हा आहे. बालकांच्या पोषणाचा दर्जा सुधारणे, बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रोत्साहन देणे, बालकांना अनौपचारिक शिक्षण देणे, बालकांच्या वजनात वाढ करण्याची पद्धत शालेय शिक्षणासाठी तयार करणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी अंगणवाडी सेविकांनी या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा चांगला उपयोग करावा, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केले.
बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल बागल यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकास व बौद्धीक क्षमता वाढवणे, बाल शिक्षणात आवश्यक टिचींग लर्निंग मटेरीयल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे, सक्षम अंगणवाडी केंद्र उभारणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. हे प्रशिक्षण 3 दिवस म्हणजे 19 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत चालणार आहे. यामध्ये अंगणवाडी यांच्या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रशिक्षणातून अंगणवाडी सेविकांनी पोषण भी पढाई भी, हे प्रशिक्षण सार्थ करावे असे आवाहन केले.