| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यात क्रिकेटवरून झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे.
पुण्यातील कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना मंगळवारी (दि.19) आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मॅच सुरु असतानाच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील तरुण पुन्हा बुधवारी (दि.20) भेटले. तर, वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले. त्यामुळे दोन्ही गटातील तरुण आक्रमक झाले. यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. त्याने पिस्तुल काढत समोर आलेल्या तरुणाच्या दिशने थेट गोळीबार केला. मात्र, या तरुणाने स्वतःचा बचाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि तो थोडक्यात बचावला. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.