महामार्ग पोलिसांना प्रथमोपचार प्रशिक्षण

। नागोठणे । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्ग पोलिस मदत केंद्र वाकण-ऐनघर या ठिकाणी लायन्स क्लब नागोठणे यांच्यावतीने गुरुवारी (दि.3) प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुकेळी येथील डॉ. साधना झोलगे व डॉ. अनिल गीते यांनी उपस्थित पोलिस कर्मचारी व मृत्युंजय दुत यांना प्रथोमपचार संबंधी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

मुंबई-गोवा महामार्ग हा अपघातांसाठी प्रसिद्ध व अंत्यंत धोकादायक महामार्ग समजला जातो. या मार्गावर दररोज अनेक अपघात घडत असतात. यामुळेच अपघात झालेल्या ठिकाणी जखमींना प्रथमोपचार मिळणे हे फार महत्त्वाचे असते. यामुळेच नागोठणे लायन्स क्लबच्यावतीने महामार्ग पोलिस केंद्र वाकण-ऐनघर या अपघात झाल्यानंतर जखमींना कसे हाताळावे व कोणत्या प्रकारे प्रथमोपचार करावे, याबाबतीत उपस्थित पोलिस कर्मचारी व मृत्युंजय दुत यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी एमजेएफ ला. विवेक सुभेकर, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनिल कुथे, उपाध्यक्ष संतोष शहासने, दिपक गायकवाड तसेच, महामार्गावरील सहाय्यक पोलिस निरीक्षक गितांजंली जगताप, उपनिरिक्षक अनिल पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस खात्याचे सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version