। रायगड । खास प्रतिनिधी ।
माणगावमधील शिवसेना (शिंदे गटाला) जय महाराष्ट्र करुन हातात तुतारी घेण्याचे संकेत ज्ञानदेव पवार यांनी दिले होते. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता, मात्र ज्ञानदेव पवार यांची शरद पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास त्यांना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा आहे.
राज्यातील विधानसभेचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार लढण्यास तयार आहेत. त्यामुळे काहींना पक्षांतून तर काहींना अन्य पक्षातील उमेदवारांचे आव्हान राहणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांची देखील अशीच डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करुन ज्ञानदेव पवार तुतारी हाती घेणार आहेत. त्यामुळे ज्ञानदेव यांच्या रुपाने आदिती तटकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात कडवे आव्हान निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार होता, मात्र काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चर्चेतील तपशील अद्याप उघड झालेला नाही. शरद पवार यांनी ज्ञानदेव यांना आपल्या पेक्षात घेण्याचे जवळपास निश्चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी शरद पवार ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहीले. ते उमेदवार दणक्यात निवडून आले आहेत. आता ज्ञानदेव पवार यांना जर शरद पवार यांचे आशीर्वाद लाभणार असतील तर आदिती तटकरे यांना निश्चितच ही निवडणूक सोपी नसल्याचे दिसते. ज्ञानदेव पवार माणगावचे शिवसेना (शिंदेगट) नेते होते. इतकंच नाही तर ते माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष देखील राहीले होते. ज्ञानदेव पवारांची ओळख ही कुणबी चेहरा अशी आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदार संघामध्ये कुणबी मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे तेथे कुणबी फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरणार आहे.