दुबईत खेळाडूंवर पैशांचा पाऊस; देशी-विदेशी 333 खेळाडू रांगेत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएल 2024च्या मिनी लिलावासाठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. हा लिलाव उद्या दि.19 दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होणार आहे. या लिलावात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यातून काही खेळाडू करोडोपती, तर काही लखोपती होणार आहेत.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली होती. यावेळी हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत.
23 खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ, 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत असलेल्या 23 खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
गुजरातकडे सर्वाधिक पैसे शिल्लक
गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये सर्वाधिक 38.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजेच, हा संघ लिलावात सर्वाधिक पैसा खर्च करू शकतो. तर, आता त्याला फक्त 8 खेळाडू खरेदी करायचे आहेत. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या पर्समध्ये सर्वात कमी 13.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाला आता आणखी 6 खेळाडू खरेदी करायचे आहेत.
लिलावात महिलेचा आवाज दुमदुमणार
या लिलावात पहिल्यांदाच भारतीय महिलेचा आवाज दुमदुमणार आहे. मल्लिका सागर दुबई लिलावात बोली लावणार आहेत. मल्लिका सागर ही मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही हे काम केले आहे. मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023च्या पहिल्या सत्रात सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली. परिणामी, मल्लिकाने महिला आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचा लिलावही केला.
खेळाडूंवर होणार करोडोंचा वर्षाव
या मिनी लिलावात केवळ भारतीय खेळाडूच नाही तर परदेशी सुपरस्टार्सवरही करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे. या लिलावासाठी एकूण 333 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यात ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, डॅरिल मिशेल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद, डेव्हिड मलान आणि टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, बेन डकेट, फिलिप सॉल्ट, टॉम बँटन आणि सॅम यांसारखे अनेक परदेशी सुपरस्टार्स आहेत.






