मंदार भिडे यांच्या ’आलेपाक’ला रसिकांचा उदंड प्रतिसाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
नाटक, संगीत आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध परंपरा असलेल्या अलिबागमध्ये प्रथमच स्टँडअप कॉमेडीचा प्रयोग रंगला. प्रसिद्ध विनोदवीर मंदार भिडे यांचा ‘आलेपाक’ हा स्टँडअप कॉमेडी शो 28 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. आयोजक वैशाली जोग यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाला अलिबागकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अलिबागच्या सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही भाषेतील स्टँडअप कॉमेडीचा हा पहिलाच प्रयोग ठरला. कार्यक्रमानंतर मंदार भिडे यांनी अलिबागच्या नाट्यगृहाचे आणि येथील व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. नाट्यगृहाची स्वच्छता, सुंदर परिसर आणि प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी यामुळे प्रयोग सादर करताना चांगला अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि पुण्यातील कलाकारांनीही अलिबागमध्ये येऊन आपले प्रयोग सादर करावेत. येथील प्रेक्षक उत्साही असून त्यांच्याकडून कलाकारांना उत्तम प्रतिसाद मिळतो, असे आवाहनही त्यांनी केले.
अलिबागमध्ये नाटक आणि ऑर्केस्ट्रासारखे कार्यक्रम नियमित होत असले तरी स्टँडअप कॉमेडी हा कलाप्रकार अद्याप सादर झाला नव्हता. अलिबागकरांना या नव्या मनोरंजन प्रकाराची ओळख व्हावी, तो येथे रुजावा आणि रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे वैशाली जोग यांनी सांगितले.
‘आलेपाक’च्या प्रयोगादरम्यान मंदार भिडे यांच्या विनोदांना प्रेक्षकांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता अलिबागमध्ये आगामी काळातही अशा दर्जेदार स्टँडअप कॉमेडी शोचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
