| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड परिसरात रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्ण महिनाभर निर्जल उपास पकडून (अल्ला) ईश्वराची भक्ती केली जाते व अमावस्येनंतर पहिली चंद्र कोर पाहून ईद साजरी केली जाते. यावेळी ईदची पहिली नमाज शनिवारी (दि.21) येथील नावाबकालीन इदगाहवर मुस्लीम बांधवांकडून अदा करण्यात आली. नमाज होताच मुरुडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व सहकाऱ्यांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी देखील एकमेकांना ईदच्या शुभेच्या दिल्या.
हिंदू बांधवांची दिवाळी तशीच मुस्लिम बांधवाची रमजान ईद. त्यामुळे या दिनी मुस्लिम बांधव नवीन वस्त्र परिधान करून नमाज अदा करतात. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ते प्रार्थना करतात. या दिवशी अदा केलेली नमाज सलात-अल-फज्र या नावाने ओळखली जाते. शनिवारी राजपुरी गावच्या मुस्लीम बांधवांनी सकाळी 7.00 वाजता ईदची पहिली नमाज जंजिरा किल्ल्यासमोर असलेल्या इदगाहवर अदा केली. ही परंपरा खूप वर्षांपासून सुरु आहे. संपूर्ण महिना प्रामाणिकपणे रोजा पूर्ण करण्यासाठी शक्ती, ताकद दिल्याबद्दल ईद दिनी अल्लाहचे आभार मानले जातात. भूख, तहान यांची जाणीव माणसांना व्हावी, या उद्देशाने रमजान महिन्यात रोजे ठेवले जातात. रोजा ठेवणे आद्य कर्तव्य मानले जाते.
नावाबकालीन इदगाहवर पहिली नमाज
