वाढवण बंदरासाठी महत्त्वाचा टप्पा
| पनवेल | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीसाठीच्या विशेष रेल्वेमार्गाचा जेएनपीए (न्हावा शेवा) ते सफाळे हा पहिला टप्पा 25 मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. देशातील प्रमुख बंदरांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार असून, तो वाहतूक क्षेत्रातील ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली असून हा मार्ग वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग आहे. जेएनपीटी (नवी मुंबई) ते दादरी (उत्तर प्रदेश) असा सुमारे 1,506 किलोमीटर लांबीचा हा मालवाहतूक रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर मालगाड्या ताशी 100 किलोमीटर वेगाने धावू शकतील. तसेच डबल-डेकर कंटेनर आणि 13 हजार टन क्षमतेच्या मालगाड्या चालविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदरासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी 76 हजार 200 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून, पूर्णत्वास गेल्यानंतर हे बंदर जगातील दहा प्रमुख बंदरांमध्ये स्थान मिळवू शकते. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
वाढवण बंदराची देशातील विविध भागांशी रेल्वे आणि रस्तेमार्गे जोडणी करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. वाढवण ते समृद्धी महामार्ग जोडणारा स्वतंत्र द्रुतगती मार्ग प्रस्तावित असून, या मार्गामुळे पालघर ते नाशिक प्रवासाचा कालावधी पाच तासांवरून अवघ्या दीड तासांवर येणार आहे. या रस्ते प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वाढवण बंदर आणि त्याच्या जोडणी प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यात रोजगार, उद्योग आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक गती आणि कार्यक्षमता प्राप्त होणार आहे.
