क्षयरोगमुक्तीसाठी रायगडात प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण

| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्याचे सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी नामांकन जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर.यांच्याकडून जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण किती किती टक्के आहे, जिल्ह्यातील क्षयरोगाचे रुग्ण संख्या सातत्याने कमी होते आहे, जिल्ह्याची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे का, याची पाहणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर. संघटना यांच्या पथकाकडून प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण दि.5 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे.

यासाठी गेल्या सन-2015 पासूनच्या ड्रग सेल डाटा मागविण्यात आलेला असून, त्यानुसार त्याचा अभ्यास करून जिल्ह्याचे नामांकन सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. या दहा गावांतून पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी एका गावातून दोन स्वयंसेवकाची निवड करण्यात आली असून वीस स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. निवड झालेले स्वयंसेवक सर्वेक्षण कशा प्रकारे करतील, याची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांना दिली आहे.

हे प्रशिक्षण अलिबाग जिल्हा परिषद येथील टिपणीस सभागृहात पार पडले. यासाठी जागतिक आरोग्य संघटनाचे रायगड जिल्ह्याचे सल्लागार म्हणून डॉ.अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.प्रा.प्रसाद वायंगणकर, प्रा.मेजर डॉ.आश्‍लेषा तावडे, प्रा.डॉ. सुनिला संजीव यांनी आपल्या मनोगतात अतिशय सखोल माहिती या प्रशिक्षण दरम्यान दिली. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाची कार्यक्रम पुस्तिका व माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी या कार्यक्रमात सर्वांनी सक्रीय योगदान देवून जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी डॉ.अशोक कटारे, डॉ.प्रताप शिंदे, जयवंत विशे, . नरेंद्र तांडेल,सतिश दंतराव, औषध निर्माण अधिकारी श्री.दत्तात्रेय शिंदे, मनोज बामणे, श्रीमती वृषाली पाटील, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच निवड झालेले स्वयंसेवक आदि उपस्थित होते. शेवटी डॉ.सुरेश ठोकळ यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version