मत्स्यदुष्काळाने मच्छिमारांची उपासमार

शेकडो नौका किनार्‍यावर
| जंजिरा | वार्ताहर |
‘समुद्र उशाशी आणि मच्छिमार उपाशी’ अशा म्हणीची परिस्थिती मुरूडच्या समुद्रात सातत्याने दिसत आहे. ऐन हंगामामध्ये कित्येक दिवसांपासून मुरूड परिसरातील अरबी समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छिमारांच्या एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनल्याचे कोळीवाड्यातून फिरताना दिसून येत आहे. मार्च महिना संपत आलाय, तरीदेखील ऐन हंगामामध्ये छोटी-मोठी मासळीदेखील मिळणे अत्यंत कठीण झाले असून, अनेक नौका मुरूड, एकदरा, राजपुरी नांदगाव, बोर्ली आदी गावी किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

याबाबत बोलताना एकदरा या गावातील मच्छिमार रोहन निशानदार म्हणाले की, खोल समुद्रात दोन टन बर्फ, 600 लिटर्स डिझेल भरून मासेमारीस गेलेल्या दालदी जाळीने मासेमारी करणार्‍या नौका मासळी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतत आहेत. यातील काही नौकांना फक्त कुपा नावाची मासळी काही प्रमाणात मिळाली आहे. कुपा मासळीला परदेशात भाव मिळतो. या भागात फारसा भाव मिळत नाही. मुरूडसारख्या भागात कुपा मासळी किलोवर न विकता प्रत्येकी रु 50/-ला एक अखंड मासा या प्रमाणे विकला जातो. त्यामुळे कुपा मिळाला तरी मच्छिमारांचा खर्च देखील सुटत नाही, ही आजची परिस्थिती आहे.

आकस्मिक बदलते वादळी वातावरण, समुद्रात होणारे प्रदूषण, एलइडी, पर्सनीन मासेमारी यामुळे छोटी मासळी, अंडी यांचा नाश होत असल्याने मासळीचे प्रमाण वेगाने घटले आहे. बोटीचा खर्च, खलाशी खर्च वसूल होत नसेल तर उदरनिर्वाह चालवायचा कसा, असा प्रश्‍न पारंपरिक मासेमारी करणार्‍या मच्छिमारांना पडला आहे. होळीनंतर खोल समुद्रातील मासळी अंडी टाकण्यासाठी उथळ खडकाळ समुद्रकिनारी येत असते. त्यावेळी नौकांना मासळी मिळत नाही. मुरूड, राजपुरी, एकदरा येथील सुमारे 100 नौका अशा परिस्थितीमुळे किनार्‍यावर परत आल्या असून, नांगरण्यात आल्या आहेत. आता तर कोलंबी, मांदेली, जवळा देखील मिळत नाही. अतिशय चिंताजनक असे चित्र आहे. आर्थिक पॅकेज नाही. शासनाच्या घोषणाबाजीचा वेळीच उपयोग नसेल तर काय उपयोग, असे प्रश्‍न काही मच्छिमारांनी बोलताना उपस्थित केले.

मुरूड मासळी मार्केट मध्ये फेरफटका मारला असता येथील समुद्रातील मोठी मासळी दिसून आली नाही. मोजक्याच मासळी विक्रेत्या महिला अलिबाग परिसरातून एलइडी मासेमारीतून मिळालेली म्हणजे बाहेरगावहून आलेली मोजकीच मासळी विक्री करताना दिसल्या. उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडलेले दिसून आले. नेमकेच बांगडे, कोलंबी, छोट्या सुरमई आणि काटेरी मासळी होती. दोन पापलेट ची किंमत रु 1000/- सांगितल्याने आम्ही तेथून पुढचा रस्ता पकडला. दिवसागणिक मुरूड परिसरात मोठ्या मासळीची कमतरता उग्र स्वरूप धारण करील, असे ठिकठिकाणी ऐकायला मिळत होते. एके काळी उदंड मासळी मिळणार्‍या मुरूडच्या अरबी समुद्रात अचानक मासळी उत्पादन नीचांक पातळीवर घटल्याने मुरूडमधील मच्छिमारांसाहित अनेकांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Exit mobile version