कोळंबीची आवक वाढल्याने मच्छिमार आनंदी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
दोन-तीन दिवसांपासून मुरूडजवळील पद्मजलदुर्ग समुद्र किनारपट्टीत कोळंबी मोठ्या प्रमाणावर मिळत असून, एकदरा, मुरूड आणि राजपुरी येथील सुमारे 50 नौका एकाच वेळी कोलंबी मासेमारी मोहिमेवर आरूढ झालेल्या रविवारी (दि. 22) दिसून आल्या. त्यामुळे मुरूड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळंबीची आवक झाल्याचे दिसून आले. असे वर्षातील नेमकेच दिवस असतात, त्यावेळी कोळंबीची आवक वाढते. कोळंबीची आवक वाढती असल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ झाल्याचे दिसून येत आहे. मुरुडच्या बंदर मार्गावरून जाताना या नौकांची समुद्रातील साखळी लक्ष वेधून घेत आहे.
कोळंबीचा हंगाम मच्छिमारांना फायदेशीर ठरतो. कारण, पाऊस परतीच्या मार्गावर असताना कडक उन्हाळा सुरू होतो. ऑक्टोबर हिट कोळंबी सुकवण्यासाठी अतिशय उपयोगाची ठरते. कोळंबी सुकवून सोड बनवण्याच्या प्रक्रियेत महिला कामाला लागतात. त्यामुळे बंदरावर महिला भगिनींची मोठी लगबग दिसून येते. आज सोड्याचा भाव 2200 रुपये किलो असल्याने हंगामात जास्तीत जास्त कोळंबी सुकविण्याकडे कोळी बांधवांचा कल असतो. कारण, वर्षभराचा नफा या काही दिवसातून मिळवणे शक्य असते. पुढे नवरात्रोत्सव, दिवाळी पर्यटकांचा हंगाम असल्याने सोड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. मुरुडचे सोडे प्रसिद्ध असल्याने इथे येणारा पर्यटक सोडे घेतल्याशिवाय जात नाही. त्यामुळे कोळंबीचा हंगाम सुरू झाल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जास्तीत जास्त नौका कोळंबीची मासेमारी करण्यासाठी समुद्रात दाखल होत असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात आले.
या हंगामात कोळंबी किनार्यावर मिळत असल्याने बोटींचा डिझेल खर्च कमी होतो. आगामी नवरात्रोत्सवापर्यंत मोठ्या प्रमाणात कोळंबीची मिळाली तर तिचे सोडे काढण्याकडे कोळी बांधवांचा कल असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. सध्या मुरुडच्या किनारी मोठ्या प्रमाणात कोळंबीचे ढीगच्या ढीग दिसून येत असून, सोडे काढण्यासाठी महिलांची बंदरांवर लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.
पद्मजलदुर्गच्या उथळ समुद्रपरिसरात कोळंबी मोठ्या प्रमाणात येत असल्याने एकदरा, राजपुरीच्या नौका मोहिमेवर दिवसातून दोन वेळा जाताना दिसून येत आहेत. टायनी, चैती, सोलट अशा प्रकारातील कोळंबी कमी-अधिक प्रमाणात जाळ्यात मिळत असल्याचे राजपुरी येथील मच्छिमार धनंजय गिदी यांनी सांगितले. बोंबिल फारसे मिळत नाही असे दिसून आले. शेलबेल, मिक्स निवडदेखील भरपूर मिळाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. संकष्टीनंतर येथे समुद्रात भांग लागत असल्याने बोंबिल अजिबात मिळत नाहीत. समुद्राला उधाण आल्यानंतर बोंबील जाळ्यात मिळतात, अशी माहिती धनंजय गिदी यांनी दिली. लाल रंगाच्या टायनी कोळंबीला मार्केटमध्ये फारसा भाव मिळत नाही. नौकांचे डिझेलचा खर्च जेमतेम सुटत असतो, अशी माहिती एकदरा येथील रोहन निशानदार यांनी दिली. सोलट कोळंबी मिळाली तर अधिक फायदा होत असतो; मात्र मिळेलच याची खात्री नसते, असेदेखील त्यांनी स्पस्ट केले.