। पालघर । प्रतिनिधी ।
पालघरमधील वाढवण बंदराचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.30) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु, या सोहळ्याबद्दल मच्छिमारांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. तसेच, बुधवारी (दि.28) झालेल्या उत्तन येथील समितीच्या सभेत राज्यातील मच्छिमार कडाडून विरोध करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी दिली आहे.
वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 60 पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मच्छिमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही. परंतु, विकासाच्या नावाखाली मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. या प्रकल्पाला समाज शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याचे समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितले आहे. तसेच, या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वाढवण किनार्यावर होणार्या आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसईतील मच्छिमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, उत्तन, मढ, मार्वे, गोराई येथील मच्छिमार समुद्रात जलसमाधी घेऊन काळे झेंडे दाखवत विरोध करणार असल्याचे डिमेलो यांनी सांगितले आहे.