मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी: आ.जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील खोपटा येथे प्रदूषित पाण्यामुळे मत्स्य व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. यासाठी संबंधित मच्छिमारांना नुकसान भरपाई दिली जावी,अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधानपरिषदेत गुरुवारी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, खोपटे, येथील मच्छिमार मासेमारीसाठी गेले असता त्यांना खोपटे खाडीमधील पाण्याला उग्र वास येत होता व मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत तरंगळ्याचे निदर्शनास आले.

याबाबत माहिती मच्छिमारांनी मच्छिमार संस्थेचे चेअरमनना सांगितली.त्यांनी याबाबतची तक्रार उरण तहसिलदार मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी, महाराष्ट्र नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय तळोजा यांना केली.पण त्याची पाहणी करण्यासाठी एकही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याचे आ.जयंत पाटील म्हणाले. पूर्ण भरतीच्या वेळी महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी तेथे पाहाणी करण्यासाठी आले. परंतु भरती झाल्यामुळे मृत झालेली मच्छी विखुरली गेली असल्यामुळे योग्य तपासणी करता न आल्यामुळे अधिकारी यांनी तपासणीमध्ये 50 ते 100 ग्रॅम वजनाची मच्छी विरळप्रमाणात मृत झाल्याचे तपासणी अहवाल स्पष्ट केले आहे.असे त्यांनी निदर्शनास आणले.

सदर घडलेल्या घटनेचा परिणाम मासेमारी व मासे विक्री व्यवसायवार मोठ्या प्रमाणावर झालेला असून सदर घडलेल्या घटनेपासून आजपर्यंत येथील मच्छिमार सदर खाडीमध्ये मासेमारीसाठी गेलेले नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सबब शासनाने या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी व संबंधी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Exit mobile version