नाखवा निघाला दर्यावरी…

समुद्राला श्रीफळ अर्पून मुरुडच्या नौका मासेमारीस मार्गस्थ; मासळीची मोठी पलटीची आशा
मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राची मनोभावे पूजा आणि त्याला श्रीफळ अर्पण करुन मुरूड तालुक्यातील कोळी बांधव मासेमारीच्या नव्या हंगामासाठी समुद्राकडे निघाले आहेत. यावर्षी मासळीची मोठी पलटी मिळेल, असा आशावाद अनेक मच्छिमारांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मासळीचे दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव, होलीलिकोत्सवानंतर नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा श्रद्धेय आणि मोठा सण आहे. पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी शासकीय स्तरावर 1 ऑगस्टपासून सुरू होत असली तरीदेखील नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण केल्याशिवाय कोळी बांधव खर्‍या अर्थाने मासेमारी सुरू करीत नाहीत, असे आजही दिसून आले. खवळलेला समुद्र नारळ दिल्यानंतर शांत होतो, अशी भावना आजच्या अत्याधुनिक काळातदेखील येथील कोळी बांधव व्यक्त करताना दिसतात.

150 नौका मासेमारीस मार्गस्थ
सोमवार आणि मंगळवारी सुमारे 150 नौका नव्या उत्साहाने मासेमारीसाठी मार्गस्थ झाल्याची माहिती मुरूड कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. तीन वर्षांपासून मासेमारीची मोठी ओढाताण होऊन बहुतांश सिझन वाया गेले होते. त्यामुळे मच्छिमार कमालीचे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. शासनाने मच्छिमारांना मदतीचा हात आता तरी द्यावा, अशी अपेक्षा मनोहर बैले यांनी व्यक्त केली आहे.

रोहा तालुक्यातील वाली ग्रामस्थांचा मुरूड समुद्राचा अंदाज
रोहा तालुक्यातील वाली हे गाव मुरूड पासून 42 किमी वर आहे. परन्तु 4 ते 5 डोंगर मध्ये असणार्‍या मुरूड किनार्‍यावरील समुद्राच्या लाटांचा आवाज पहाटे 2 ते 3 च्या सुमारास वाली गावात स्पष्ट पणे ऐकता येतो. आम्ही त्या लाटांच्या आवाज वरूनच पाऊस कशा प्रकारे आणि कधी येईल असा पक्का अंदाज बांधत असतो अशी माहिती वाली येथील बुजुर्ग मंडळीनी दिली.जुन्या गोष्टी अजूनही आजच्या पिढीला धक्कादायक वाटतात ते उगाच नाही.जुने ते सोने म्हणतात ते देखील उगाच नाही.

Exit mobile version