अवकाळीमुळे अवकृपेमुळे मच्छीमार हवालदील

नौकांनी घेतला खाड्यांचा आधार
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील मच्छीमार बांधव अवकाळीमुळे हवालदील झाले आहेत. ऐन थंडीच्या हंगामात असणार्‍या पावसामुळे समुद्रात दाखल झालेल्या नौकांनी आंजर्ले, दाभोळ, जयगड या खाडी परिसरांचा आधार घेतला आहे.
एकीकडे कोरोना महामारी, या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेली टाळेबंदी, दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्ती या सर्वांचा सामना केल्यानंतर आता प्रत्येकालाच या अवकाळीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुन्हा एकदा मच्छीमारांची धावपळ उडाली असून, पंधरा दिवस देखील झाले नसतील की, पुन्हा मुसळधार पाऊस जोरदार वार्‍यामुळे मासेमारी उद्योगावर कुर्‍हाडच बसली आहे. अशा वारंवार बिघडणार्‍या वातावरणामुळे मच्छीमारांचे खूप नुकसान होत आहे.
सुरुवातीपासूनचा मासळी हंगाम दुष्काळातच गेला. सप्टेंबर महिन्यात मासळीची आवकच कमी होती. तर ऑक्टोबर महिन्यात फिशमीलने जोर धरला होता. आणि नोव्हेंबरमध्ये तर मासळी मिळत होती पण दर नव्हता तर या महिन्याच्या शेवटी वादळी वातावरणामुळे या उद्योगावर संक्रांतच आली होती. त्यात छोट्या नौकांना मासळीची आवक होती. मोठ्या ट्रॉलर नौका नुकसनातच होत्या. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून चांगल्या प्रकारची बंपर मासळी मिळू लागली होती. परंतु त्या मासळीला दरच मिळत नव्हता.
पर्यटनामुळे जरा कुठे या उद्योगाला तेजी आली होती तर वादळाने तोंड वर काढले. गेल्या महिन्यात साधारण 16 तारखेपासून सतत पाच ते सहा दिवस म्हणजे 22 ते 23 तारखेपर्यंत वादळसदृश्य परिस्थिती होती. त्यावेळीही मासेमारी बंद होती. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल थांबली होती. आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा वादळाचा तडाखा बसला आहे.
या परिस्थितीत नुकत्याच मासेमारीकरिता आलेल्या सुमारे 500 ते 600 नौकांनी जवळपास असलेल्या खाडीत आसरा घेतला आहे. जयगडखाडी जवळ असलेल्यांनी जयगड तर दाभोळ जवळ मासेमारी करत असलेल्या नौकांनी दाभोळ तर हर्णे बंदरात आणि आंजर्ले जवळपास असलेल्या नौकांनी आंजर्ले खाडीत आसरा घेतला आहे.
मुसळधार पाऊस वादळवारा होणार असा संदेश हवामान खात्याकडून मिळताच हर्णे बंदरातील नौकामालकांनी आपल्या नौका सुरक्षिततेसाठी काल सायंकाळीच आंजर्ले खाडीत नेल्या आहेत.पुढील चार दिवस सतत असच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याकडून समजले असल्याने नौका वातावरण शांत होईपर्यंत खाडीतच राहतील असे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.

Exit mobile version